नाशिक -राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात याचाच एक भाग म्हणून 'हर घर दस्तक' अभियानाद्वारे घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहरात दुसरा डोस न घेतलेले ते 23 टक्के नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली.
नाशिक शहरात 700 पथके -नाशिक शहरातील 6 विभागात लसीकरणासाठी 700 पथकांची स्थापना केली जाणार आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत. या सोबतच ज्या ठिकाणी लसीकरण न झालेल्यांची संख्या अधिक असेल त्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त पवार यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.
23 टक्के नागरिकांनाच घेणार शोध -नाशिक शहरात 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 13 लाख 63 हजार 700 लोकांना लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आला होत्या. पैकी जवळपास 96 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही 77 टक्के आहे. त्यामुळे ते 23 टक्के नागरिकांनी अद्याप दुसरा घेतला नाही. तर 15 ते 18 वयोगटातील 90 हजार 300 युवकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत एकूण 69 टक्के युवकांनी पहिला तर 44 टक्के युवकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे अद्याप 31 टक्के युवकांनी पहिला तर 56 टक्के युवकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. 14 वर्षाखालील किशोरवयीन गटातील 58 हजार 450 मुलांपैकी 72 टक्के मुलांनी पहिला तर 34 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतल्याने लसीकरण न केलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण केंद्रपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा -Woman Fell Into Well : नाशिक पाणीटंचाईच्या झळा, पाणी भरताना महिला पडली विहिरीत