नाशिक -जिल्ह्यात गेले अनेक महिने शासन, प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
माहिती देताना पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण 62 ऑक्सिजन प्रकल्पातून साधारण 155 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मीती होणार आहे. यापेक्षा अधिक ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. दुसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तयार झालेली प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, त्या अनुषंगाने आवश्यक असणारा औषध साठा करण्याचे नियोजन करण्यात येवून दुपटीने सर्वसमावेशक तयारी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असून शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या मॉल्समधील कर्मचाऱ्यांची आरटीपीआर चाचणी करणे आवश्यक असून तेथील कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावेत. तसेच तेथे जास्त गर्दी होणार नाही याकरिता तेथील दुकानदारांनी दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री यांना सादर करतांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मीती क्षमता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या देखील काही प्रमाणात कमी होत आहे. महानगरपालिका रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पालकमंत्री यांना दिली आहे.
याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. उत्कर्ष दुधडीया, डॉ. आवेश पल्लोड, डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.