महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी मंत्री विनायक पाटील अनंतात विलीन; ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले - पालकमंत्री छगन भुजबळ

देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायक पाटील यांचे निधन झाले.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ - पालकमंत्री

By

Published : Oct 24, 2020, 8:06 PM IST

नाशिक - देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायक पाटील यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचे हरपले असल्याच्या शोकभावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानंतर नाशिक येथील त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी होऊन नाशिकच्या द्वारका पंचवटी अमरधाम येथे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. तसेच शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केले. पवार यांचे ते जीवाचे मित्र होते. नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ते ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले, असे भुजबळ म्हणाले.

विनायक पाटील यांना मिळालेले पुरस्कार

विनायक पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते.यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

विनायक पाटील यांचा जीवनप्रवास

विनायक पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

छगन भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायक पाटील यांच्या निधनाने पाटील कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, राज्य शासनाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details