नाशिक -राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. रविवारी खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी बागलाण तालुक्यातील इजमाने येथील युवा शेतकरी अभिजीत धोंडगेने लोकप्रतिनिधी समोरच हंबरडा फोडला.
नुकसानीची व्यथा मांडताना लोकप्रतिनिधी समोर शेतकरी ढसाढसा रडला हेही वाचा... 'तहसिल कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार' नरहरी झिरवाळ यांचा प्रेरणादायी प्रवास
खासदार आल्यानंतर भावनाविवश झालेल्या अभिजीतला रडू कोसळले. आपल्या व्यथा मांडताना उच्चशिक्षित असलेल्या या युवा शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले, यावेळी सगळ्यांचाच गहिवरून आले.
हेही वाचा... डॉ. शेफाली भुजबळ यांनी साजरी केली 'शहीद जवानाच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी'
परतीच्या पावसाने बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. तालुक्यातील मका, बाजरी, कांदा, भाजीपाला, डाळींब, कांदा रोपे आदी पिकांची मोठी हानी झाली आहे. लाखो रुपयांच्या शेतीपिकांची अक्षरशः माती झाली आहे. त्यातच तालुक्यात पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर अवघ्या पाच दिवसांत अक्षरशः कोट्यवधीचा फटका बसला आहे. हजारो रुपये खर्च करून लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या पूर्वहंगामी द्राक्षाला परतीच्या पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. बागलाण तालुक्यात तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात पूर्वहंगामी द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पाच दिवसात हे सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.
हेही वाचा... अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर
शेती पिकाची नासाडी झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.
हेही वाचा... परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान; कांदा, सोयाबीनसह इतर पिकांना फटका
लोकप्रतिनिधींनी 'धीर धरा' असे सांगताच अभिजित धाय मोकलून रडू लागला. तसेच भावनाविवश अभिजितने आत्महत्येचा विचारही बोलून दाखविला. परंतु, लेकराबाळांमुळे तसेही धाडस होत नसल्याचे हताशपणे सांगताच सगळ्यांनाच गहिवरुन आले.