नाशिक - समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नूतनीकरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
'प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे चरित्र'
पुढे ते म्हणाले, की एखाद्या अधिकाऱ्याला देवपण क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात. आपल्यातल्या देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतांनी दिला आहे. हा आदर्श देवमामलेदार यांच्या जीवनातून घ्यावा. त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रबोधिनीत ते पोहोचविण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. देवमामलेदाराच्या जीवन चरित्रावर आधारीत लघूपट निर्मितीसाठी निधी देण्याचे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
'सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक'
चांगले जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करून राज्यपाल म्हणाले, की रामासोबत वानरसेना होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेवून साम्राज्य उभे केले. अशाच प्रकारे सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यशवंत महाराज यांचा शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श समोर ठेवल्यास देश घडविता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा सेवाभाव आवश्यक आहे.
मंदिराला भेट देवून घेतले दर्शन
तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी देवमामलेदार श्री यशवंत महाराज मंदिराला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांसह पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी मंत्री दादा भुसे यांचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते देवमामलेदार स्मारक नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी स्मारकाला भेट देवून माहिती घेतली.
'पुढील ५० वर्षांचा विचार करून स्मारक उभारावे'
पुढील ५० वर्षांचा विचार करून देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारावे, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, हे स्थान अंधश्रद्धेचे नसून ‘सेवा हाच धर्म’ असा संदेश देणारे आणि सर्व अंधश्रद्धा बाजूला सारून सेवेचा आदर्श प्रस्तुत करणारे देवस्थान आहे. जनता संकटात असताना देवमामलेदार यांनी जनतेला सहाय्य केले. त्या काळातील ते मोठे धाडस होते. त्यांचे हे कार्य सामाजिक क्षेत्रात आणि शासकीय सेवेत असलेल्यांसाठी मोठे उदाहरण आहे.
'तीर्थस्थळाला देणार ‘ब’ दर्जा'
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शासन निर्णयाचा उपयोग जनतेला होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी, याची प्रेरणा देवमामलेदारांच्या स्मारकातून मिळते. या तीर्थस्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटनस्थळांच्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. तीर्थस्थंळाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगीगड, नस्तनपूर, आणि टाकेदसारख्या तीर्थस्थंळाचा विकास करण्यात आला आहे. बोट क्लबच्या सुंदर कामाची दखल अमेरिकन नियतकालिकाने घेतली. देशात लौकिक होईल असे उत्तम स्मारक उभे करावे आणि त्याबरोबर पर्यटन वाढावे म्हणून शहरदेखील स्वच्छ ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामध्ये सेवा करणारे डॉक्टर आणि पारिचारीका यांच्या सेवाकार्याचा छगन भुजबळ यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
'स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास'
देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास जनता देवत्व प्रदान करते, हे दर्शविणारे देशपातळीवरील हे एकमात्र उदाहरण आहे. यातून आदर्श घेत जनतेसाठी काम करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. सटाणा शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू. जनसेवेचा आदर्श म्हणून हे स्मारक ओळखले जाईल.
या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.