नाशिक- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन अंमलात आणले. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी चित्रपट गृह, नाट्यगृह, ग्रंथालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत अनलॉक काळात सरकार टप्याटप्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सात महिन्यापासून बंद असलेले ग्रंथालय, वाचनालय राज्य सरकारने सुरू केले असून आज पहिल्याच दिवशी नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयात वाचक प्रेमींनी गर्दी केल्याचे दिसून आले.
माहिती देताना वाचनालय प्रमुख, ग्रंथ सचिव आणि वाचक नाशिकचे सार्वजनिक वाचनालय १८० वर्ष जुने असून देशातील पाच मोठ्या व जुन्या वाचनालयांपैकी एक आहे. या वाचनालयात अडीच लाखाहून अधिक पुस्तकांचा साठा असून यात ग्रंथ, कादंबरी, कविता, बाल पुस्तके, आत्मचरित्र आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे. तसेच, या सार्वजनिक वाचनालयाची सभासद संख्या १० हजारहून अधिक आहे. वाचनालयाचा रोजचा वाचक वर्ग ३ हजारहून अधिक आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर वाचनालय सुरू झाल्याने वाचकांनी आनंद व्यक्त केला.
वाचनालयात घेतली जातेय काळजी
वाचनालयात २० हून अधिक कर्मचारी वर्ग असून रोज शेकडो वाचक पुस्तके घेण्यासाठी वाचनालयात येत असतात. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी सावधानता म्हणून सार्वजनिक वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घातल्यानंतरच वाचनालयात प्रवेश दिला जात आहे. तसेच, वाचनालयाच्या प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझरची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, वाचकांनी आणलेले प्रत्येक पुस्तक हे एका बॉक्समध्ये ठेऊन ते निर्जंतुकीकरण करूनच पन्हा वाचनालयात ठेवले जात आहे.
वाचनालय सुरू झाल्याचा आनंद
कोरोनामुळे सर्वच सार्वजनिक व्यवस्थांबरोबर ग्रंथालय आणि वाचनालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊन काळात सर्वच जण घरी असल्याने अनेकांनी आपली वाचनाची आवड जोपासली. मात्र, वाचनालय बंद असल्याने अनेकांनी मित्र मंडळींकडून पुस्तकाची देवाणघेवाण करून वाचनाची आवड जोपासली असल्याचे सागितले. पण, या काळात आवडीची पुस्तके मिळाली नसल्याने वाचकांचा हिरमोड देखील झाल्याचे वाचक प्रेमींनी सागितले. आज वाचनालय सुरू झाल्याने वाचकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा-धक्कादायक..! कोरोना काळात घराबाहेर पडणाऱ्या आजोबाचा नातवाने केला खून