नाशिक - कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याचा धक्का वीस वर्षीय मुलीला असह्य झाल्याने तिने रविवारी नाशिकरोड येथील कोविड सेंटरच्या आवारात सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलीस चौकीत अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आईचा कोरोनाने मृत्यू, तरुणीने कोव्हिड सेंटरमध्येच सॅनिटायझर घेऊन केली आत्महत्या
कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याचा धक्का वीस वर्षीय मुलीला असह्य झाल्याने तिने रविवारी नाशिकरोड येथील कोविड सेंटरच्या आवारात सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिलला जयाबाई लक्ष्मण भुजबळ या महिला कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर नाशिकरोड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. यावेळी मुलगी शिवानी ही आईची देखभाल करत होती. रविवार 2 एप्रिल रोजी जयाबाई यांचा मृत्यू झाला. शिवानीला हा धक्का सहन झाला नाही आणि जवळ असलेली सॅनिटाझरची बाटली घेऊन कोविड सेंटर बाहेर येत तिने सॅनिटायझर पिऊन घेतले.
या घटनेनंतर भावाने तिला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तिला बरे वाटले म्हणून शिवानीच्या आग्रहाखातर रुग्णालयात न थांबता भाऊ तिला घरी उपचार घेऊ म्हणून घरी घेऊन गेला. मात्र सोमवारी त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच शिवानीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणि जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.