नाशिक- सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४५ अंशाजवळ गेला आहे. याचा फटका माणसांना तर बसत आहे शिवाय वन्यजीव, प्राणी आणि पक्षांनाही बसत आहे. पाऊस चांगला झाला नसल्याने दुष्काळ पडला आहे. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. यामुळे चांदवड तालुक्यात पाणी आणि उष्माघातामुळे तब्बल ४० मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चांदवड तालुक्यातील दीघवद आणि दहिवड या २ गावांमध्ये एका महिन्यात तब्बल ४० मोरांचा पाणी आणि उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पक्षीप्रेमी आणि ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी या गावात काठीयावड नागरिकांच्या १४ गायी आणि २ म्हशींचा चारा आणि पाण्याअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता मोरांच्या मृत्यूमुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची किती भयावह परिस्थिती आहे, हे दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील शेकडो गाव, वाड्या, वस्तींवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच प्रशासनाने जंगलातील प्राण्यांना जंगलातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्राणीप्रेमी आणि पक्षी प्रेमींकडून होत आहे.