मनमाड (नाशिक) : मागील तीन महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून (गुरुवार) मनमाड रेल्वे स्थानकावर 'हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर' या सचखंड एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी मनमाड गुरुद्वारातर्फे लंगर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मनमाड गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंगजी यांनी स्वतः त्यांच्या हस्ते गाडीतील प्रवाशांना भोजनाची पाकिटे दिली आहेत. मागील 28 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा कोरोना लॉकडाऊनमुळे बंद होती.
सचखंड एक्सप्रेसमधील प्रवाशांना मनमाड गुरुद्वाराकडून अन्नवाटप पुन्हा सुरु... हेही वाचा...बाबाजी का लंगर.. लॉकडाऊन काळात गरजूंसाठी २४ तास खुला, 20 लाख वाटसरूंची शमवली भूक
भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर ते टप्प्या टप्प्याने वाढवण्यात आले. यामुळे भारताच्या इतिहासात प्रथमच रेल्वे सेवा बंद करण्यात आली. जवळपास अडीच ते तीन महिने रेल्वे बंद होती. लॉकडाऊन 4.0 नंतर आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे मंत्रालयाने देशभर 200 रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात मनमाड शहरातून काही रेल्वे मार्गक्रमण करणार आहेत. यातील 'हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर' ही सचखंड एक्सप्रेस देखील आहे.
जेव्हापासून ही रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे, म्हणजेच 1992 सालापासुन या गाडीतील प्रवाशांना मनमाड गुरुद्वारा तर्फे प्रसाद (लंगर) वाटप करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रेल्वेगाडी बंद करण्यात आली होती. त्यामुळे लंगर सेवा देखील बंद होती. मात्र, गुरुवारपासून गाडी पुन्हा सुरु झाल्याने एक्सप्रेसमधील प्रवाशांना पॅकिंग स्वरूपात लंगर (अन्न) वाटप करण सुरू करण्यात आले आहे.
सर्व प्रकारची खबरदारी घेत आणि सुरक्षा नियमांचे पालन करत, हातात ग्लोव्हज् घालून, सुरक्षित अंतर ठेऊन मनमाड गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंगजी आणि इतर सेवेकरी यांच्या हस्ते प्रवाशांना अन्नाची पाकिटे देण्यात आली. आता इथून पुढे ही सेवा अविरत सुरू राहणार असल्याचे बाबा रणजित सिंग यांनी सांगितले आहे.