नाशिक -जून महिना सापण्यावर आला असताना सुद्धा नाशिक जिल्ह्यात अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात करावी, असे जिल्हा कृषी विभागाने सांगितले आहे. तसचे, यावर्षी बियाणे, युरिया आणि खताचा तुटवडा भासणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आल्याचे देखील कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात अद्याप पाहिजे तशी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे, येथील शेतकरी शेतात पिकांची पेरणी करण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, चांदवड, नांदगाव या भागांत काही प्रमाणत पाऊस झाला असून येथील काही शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात केली आहे. मात्र, पावसाच्या बाबतीत सर्वाधिक आघाडीवर असणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत केवळ 2.3 मिलिमीटर पावसची नोंद झाली आहे. या भागात ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी भातासाठी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाऊस समाधानकारक नसून पुढील आठ दिवसांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे, अस म्हटले जात आहे.
मुबलक खतांचा साठा -नाशिक जिल्ह्यात खतांचे नियोजन करण्यात आले आहे. आमच्या मागणीनुसार खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 1 लाख 18 हजार मेट्रिक टन खतांची मागणी असून 1 लाख 40 हजार एवढा खताचा पुरवठा झालेला आहे. सद्या खताची मागणी वाढली आहे. नाशिक हा कृषिमंत्री यांचा जिल्हा असल्याने इथे चोख नियोजन करण्यात आले आहे. 6 हजार मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक ठरवण्यात आला आहे. ज्या तालुक्यात खतांची टंचाई जाणवेल तिथे त्याचा वापर करण्यात येइल, असे कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी सांगितले.