नाशिक - जागतिक वस्तू संग्रहालय दिवस सप्ताह निमित्त नाशिकमध्ये सरकारवाडा या ऐतिहासिक वाड्यात अनेक पुरातन, शिवकालीन, पेशवेकालीन वस्तूंचा संग्रह ( Collection of Shiva and Peshwa items ) साकारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ( Department of Archeology Government of Maharashtra ) संयुक्त विद्यमाने या संग्रहालयात शिवकालीन मर्दानी युद्धातील शस्त्रे, जुन्या देवदेवतांच्या मूर्ती, पेशवेकालीन साहित्यची मांडणी, जुन्या काळी घरात लागणारी वस्तू, येथे ठेवण्यात आल्या आहेत. 24 मे पर्यंत नाशिककरांना हे प्रदर्शन ( Historical exhibition Nashik ) पाहायला मिळणार आहे.
सराफ बाजारातील सरकार वाडा येथे वास्तू संग्रहालय दिनानिमित्त नाशिककरांना युद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शिवकालीन छडीपट्टा, राजाराणी, तलवारी, दांडपट्टा, छोटीशी तोफ तर पेशवा आणि शिवकालीन जुन्या काळी वापरण्यात येणारे लेखन साहित्य, काथचून्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक डब्या, हळदी कुंकवाचे करंडे, कोयरी, जुने पुरातन अडकित्ते, बिचवा, खंजिरी, सुरा सारखे छोटी शस्त्र, स्त्रियांचे जुने दागिने, गळसरी, जुना कमरपट्टा, अत्तराच्या आकर्षक आणि देखण्या जुन्या विविध आकाराच्या बाटल्या येथे बघायला मिळणार आहे.