नाशिक - शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नाशिक मध्ये एका शेतकऱ्याने चक्क द्राक्षाच्या बागेत हॉटेल थाटले ( Grape Farm Hotel Nashik ) आहे. या हॉटेलमध्ये मिळणारा झणझणीत मिसळपाव खाण्याचा आनंद घेण्यासाठी मिसळ प्रेमी दूरदूर वरुन येत आहेत.
द्राक्ष बागेत थाटले हॉटेल द्राक्षाची पंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकचे द्राक्ष हे सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. मात्र आता याच द्राक्ष बागेत बसून खवय्ये मिसळ पावचा आस्वाद घेतात. नाशिकच्या मखमालाबाद रस्त्यावर ग्रेप्स एमबेसी हे हॉटेल आहे. नाशिककर मिसळ प्रेमी आहेत, त्यामुळेच नाशिकमध्ये शेकडो मिसळचे हॉटेल आहेत. आणि हीच बाब ओळखून किरण पिंगळे या शेतकऱ्याने नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल साकारल आहे. युवक, युवती, आबालवृद्धांची गरज ओळखून परिवारासोबत इथे एकत्रित मिसळला आनंद घेतात.
मिसळ सोबत हे ही मिळते -सर्वसामान्य नागरिकांना परवडेल हा उद्देश डोळ्यासमोर ठरून हॉटेल सुरू करण्यात आलं,येथे 100 रुपयात 1 पाणी बॉटल, 1 पापड, मटकी, बटाटे मिक्स, पाव, दही वाटी, द्राक्ष, मनुके अशी नाविन्यपूर्ण डिश ग्राहकांचे मन जिंकतात.
द्राक्ष बागेत थाटले हॉटेल शेतीला पूरक व्यवसाय -नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. मात्र अनेकदा निसर्गाच्या लहरींपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरकवला जातो. ही बाब ओळखून शेतकरी आता वेगळे विचार करू लागले आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतीत काही भागात निसर्गाच्या सानिध्यात हॉटेल व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. नाशिक शहरा लागत द्राक्ष बागेत, सिल्व्हर ओक झाडांच्या सानिध्यात, पेरूच्या बागेत सुरू करण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने तो समाधानी असल्याचे चित्र आहे.
वेगळे समाधान -आम्ही पहिल्यांदा नाशिकला आलो. द्राक्ष बागेत मिसळ मिळते हे फक्त ऐकले होते. मात्र आज प्रत्यक्षात इथे येण्याचा योग आला. इथे आल्यावर एक वेगळेच समाधान मिळले आहे. याठिकाणी बसण्याची व्यवस्था खूप छान आहे. इथली मिसळ पण खूप छान आहे. खरे तर शेतकऱ्यांनी असे प्रयोग सगळीकडे केले तर त्याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकेल, असे एका मिसळ प्रेमीने सांगितले.
शेतकऱ्याची सामाजिक बांधिलकी -शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आम्ही द्राक्ष बागेत मिसळ ही संकल्पना आणली. त्याला नाशिककर नाही तर बाहेरून येणाऱ्या ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आज येथे येणारा प्रत्येक जण समाधानी होऊन बाहेर पडतो आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. समाजासाठी आपले काही तरी देणे लागते या उद्देशाने आम्ही अंध, गतिमंद नागरिकांना मोफत सेवा देतो. तसेच लष्करात असलेल्यानांही 50 टक्के सूट देतो. आज शेती हा व्यवसाय शाश्वत राहिला नाही, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याला पूरक व्यवसाय करणे काळाची गरज असल्याचे हॉटेल संचालक प्रतीक संधान यांनी सांगितले.
हेही वाचा -Minister Aditya Thackeray : '...तर मुंबईत किमान गुडघ्यापर्यंत पाणी साचु शकते'