नाशिक - जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व विजेची मागणी वाढली आहे. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात मागील 22 दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ( nitin raut on load shedding in nashik ) दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात नवीन 33/11 केव्ही डहाळेवाडी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
उपकेंद्राचे अनावरण - दुर्गम भागात ४ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विद्युत उपकेंद्रामुळे या भागातील ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.या उपकेंद्रामुळे वावीहर्ष, टाकेहर्ष, डहाळेवाडी, चंद्राचे मेट कळमुस्ते, अस्वलीहर्ष, दाडोशी, उमेशीमेट, बर्डेचीवाडी या आठ गावांतील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ होईल. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्रातील परिसरातील नामफलकाचे अनावरण, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पूजन आणि आवारात वृक्षरोपण करण्यात आले.