नाशिक : सातत्याने कांद्याच्या भावात होणारी घसरण आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं होत असलेले नुकसान लक्षात घेत, नाशिकच्या रुई गावात शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषदेचं आयोजन केलं होतं. या कांदा परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला ८ दिवसाचं अल्टिमेटम देत मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने जर मागण्या माण्य केल्या नाही तर दारूच्या वाटलीत कांद्याचा रस भरून आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सरकारचे कांदा उत्पादकांकडे लक्ष नाही : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) कांदा उत्पादकांकडे लक्षच नाही. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे ढकलायची आणि मोकळे व्हायचे असे, या सरकारचे काम आहे. कांदा, डाळिंब तसेच नाशवंत पिके हमीभावाच्या कक्षेत कशी आणता येतील, असा आमचा प्रयत्न आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी रद्द केलेला कृषी मूल्य आयोग राज्य सरकारने गठीत करावा. कांद्याला योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे. कृषी मंत्री दादा भुसे यांचां हा जिल्हा असल्याने त्यांना लाज वाटायला हवी अशी घनाघाती टीका दरेकर यांनी केली.
कांदा परिषदेचं आयोजन : नाशिकच्या निफाड तालुक्यात कांद्याच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आंल होत. या कांदा परिषदेला राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेला संबोधित करताना शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. येत्या ८ दिवसात कांदा प्रश्न सोडला नाही तर मंत्रालयावर दारूच्या बाटलीत कांद्याचा रस भरून घेऊन येत आंदोलन करू असे अल्टिमेटम सदाभाऊ खोत यांनी दिलं.
गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली :दरम्यान परिषदेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली, शेतकऱ्यांनी रस्त्यावर न लढता, असे सांगताना त्यांनी शरद पवारांच्याबद्दल अर्वाच्च शब्द वापरून टीका केली. तर, किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा अनिल परब आणि वसुली प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही असा टोला त्यांनी लगावला. शेतकरी नेते शरद जोशी यांनी ३९ वर्षापूर्वी याच नाशिकच्या रुई गावात कांदा परिषद घेत, कांद्याच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते. त्याच गावात तब्बल ३९ वर्षांनी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद पार पडली.
कांदा परिषदेत राजकीय आरोप :मात्र, या कांदा परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न कमी आणि राजकीय आरोप जास्त झाल्याने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीशी निराशा पडली. सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिलेले अल्टिमेटम, गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका याच्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
भविष्यात कांदा उत्पादक व शेतकऱ्यांची दिशा काय :आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, भविष्यात कांदा उत्पादक व शेतकऱ्यांची दिशा काय असावी. यादृष्टीने ही कांदा परिषद आयोजित केली आहे. ३९ वर्षांपूर्वी म्हणजे १९८२ रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढणारे नेते शरद जोशी यांनी अशा प्रकारची कांदा परिषद घेतली होती. सरकार कोणाचे आहे हा विषय नाही. ३९ वर्षे झाले तरी हा प्रश्न सुटला नाही. राज्यकर्ते इतक्या वर्षातील कांदा उत्पादकांना न्याय देऊ शकले नाहीत. सदाभाऊ खोत हे कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्यण घेतले.