महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये बैठक शिवसेनेची, चर्चा मात्र भुजबळ प्रवेशाची

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज उत्तर महाराष्ट्रातील सेना नेत्यांची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नेमके भुजबळ सेनेत प्रवेश करणार की नाही याबाबत स्पष्टपणे बोलणे टाळले. तरीही सूत्रांच्या माहितीनुसाार बैठकीमध्ये भुजबळ प्रवेशाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत

By

Published : Sep 4, 2019, 11:47 PM IST

नाशिक- राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशासंदर्भात संजय राऊत यांनीही गुढ कायम ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज उत्तर महाराष्ट्रातील सेना नेत्यांची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत


छगन भुजबळांनी स्वतः, 'मी आहे तिथे बरा आहे' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट असल्याचे सांगून संजय राऊत यांनी नेमके भुजबळ सेनेत प्रवेश करणार की, नाही याबाबत मात्र स्पष्टपणे बोलणे टाळले. भुजबळ यांच्यासह नारायण राणे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात बोलताना नारायण राणे यांना घ्यायचे की, नाही तो भाजपचा विषय आहे. राणे जरी भाजपमध्ये गेले तरी आमचा विरोध नसेल असे वक्तव्य राऊत यांनी आज नाशिकमध्ये केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. खरंतर मागच्या काही वर्षांपासून राणे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे राणे यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. असे असताना राऊत यांच्या आजच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. शिवसेनेत मुलाखती होत नाहीत तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात, असे देखील राऊत म्हणाले.

आढावा बैठकी दरम्यान येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी भुजबळांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. मात्र, बैठकीचा भुजबळ हा विषयच नसल्याने त्याविषयी चर्चाच झाली नसल्याचा दावा शिवसेना नेते खासदार राऊत यांनी करत त्यावर अधिक बोलणे टाळले असले तरीही बैठकीमध्ये भुजबळ प्रवेशाची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details