नाशिक - शहरामध्ये व्हेंटिलेटर बेड वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केऊर फंडातून 60 व्हेंटिलेटर मिळाले आहेत. मात्र, जोडणी अभावी अजूनही बिटको रुग्णालयात ते धुळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जोडणीअभावी व्हेंटिलेटर धूळखात -
नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलेटर मिळूनही ते जोडणीअभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासन किती निष्काळजी आहे, हे यावरून दिसून येत आहे. याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी संबंधित कंपनी संपूर्ण भारतात व्हेंटिलेटर तयार करते व जोडणी करते. मात्र, संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी जोडणीचे काम चालू आहे. जोडणी करणारी टिम ही आली नाही म्हणून ते पडून आहेत. मात्र, अशी ढकला ढकली न करता, तात्काळ या व्हेंटिलेटरची टेक्निकल अडचणी दूर करून त्यांची जोडणी केली तर, अनेक रुग्णांचे जीव वाचतील. प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप बळी गेले आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
व्हेंटिलेटर बसण्यासाठी दोन दिवसात कर्मचारी येणार -
व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी येत्या दोन दिवसांत नाशकात येऊन ते सुरू करून देणार आहेत. त्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. पंतप्रधान केअर फंडातून महानगरपालिकेला मिळालेल्या व्हेंटिलेटरच्या इतर भागांची पूर्तता कंपनीकडून झाली नाही, त्यामुळे काही व्हेंटिलेटर सुरू करता आले नाहीत, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले. पुढे आयुक्तांनी सांगितले, की व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीकडे सातत्याने कामाचा वाढता ताण असल्यामुळे त्यांना आपल्याकडे मनुष्यबळ पाठवता आले नाही, हे त्यांनी मान्य केले आहे. आता झालेल्या चर्चेनुसार ते येणाऱ्या दोन दिवसात तांत्रिक कर्मचारी पाठवून व्हेंटिलेटर व त्याचे सुटे भाग जोडून दिल्यानंतर पुढील कामकाज सुरू होईल.