नाशिक - शहरात डेंग्युसह साथीच्या आजारांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यूचा तर उद्रेक झाला असून नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे विक्रमी 322 रुग्ण आढळून आले आहे. साथीच्या आजारांनी तर सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढत आहे. माघील काही वर्षांतील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी पाहता एकाच महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे.
नाशिकध्ये आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 11 महिन्यांत या आजाराने बाधित झालेल्यांची संख्या आता 871 वर पोहोचलीय. आतापर्यंतची डेंग्यूच्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. ही परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांकडून घरभेटी दिल्या जात असून ठेकेदाराची माणसे असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना नागरिकांकडून प्रवेश नाकारला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत प्रभावी जागृती होत नसल्याचा दावा आता विभागाकडूनच केला जात आहे.