नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून ऑक्सिजन तुटवड्या बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हॉस्पिटलने रुग्णांसाठी 5 हजार रेमडेसिवीरची मागणी केली असतांना प्रशासनाला केवळ 200 रेमडेसिवीर मिळाले असल्याने, जिल्हा प्रशासन हतबल झाले असून दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिवीर उत्पादक कंपनीकडून पुढील काही दिवसात टप्याटप्याने 20 हजार रेमडेसिवीर मिळतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. रोज 5 ते 6 हजार कोरोनाबाधित आढळून येत असून 50 हुन अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी, खासगी हॉस्पिटल बरोबर सर्वच कोविड सेंटरचे बेड फुल झाले असून रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. तर दुसरीकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. जवळपास 6 ते 7 हजार रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असून 5000 हजारच्या तुलनेत फक्त 200 रेमडेसिवीर उपलब्ध झाले असुन उर्वरित 19 हजार 800 रेमडेसिवीर टप्याटप्याने मिळतील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. रेमडेसिवीर मिळवण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांचे नातेवाईक गर्दी करत असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रेमडेसिवीरचा काळा बाजार -
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा आल्याने अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. नातेवाईकही आपल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी 1200 रुग्णांना मिळणाऱ्या रेमडेसिवीरसाठी 20 ते 25 हजार रुपये मोजत असल्याचे चित्र आहे.