नाशिक -अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये प्रति हेक्टरी मदत करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, अशी टिकाही दरेकर यांनी केली. ते नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पहाणी दौरा केला.
मागील आठवड्यात नाशिकच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. याचा सर्वाधिक मोठा फटका हा बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर, पठावे दिगर, मोरकुरे, दसाने, केरसाणे मुल्हेर अंतापूर यांसह जवळपासच्या गावांना बसला. दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा पहाणी दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच सलग तीन वेळा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तरी देखील सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, अशी टिका सरकारवर केली. तसेच शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत करावी तसेच विजबिले तात्काळ माफ करावी, अशी मागणी यावेळी दरेकर यांनी केली आहे.
सरकार असंवेदनशील-
मागील आठवड्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले आमदार दिलीप बोरसे यांना संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केरसणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात कुलूपबंद केल्याची घटना घडली होती. दरम्यान प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत एकही मंत्री किंवा राज्य शासनाचे कोणतेही प्रतिनिधी याठिकाणी न फिरकल्यानं त्यांनी सरकार असंवेदनशील असल्याचे सांगत रोष व्यक्त केला.