नाशिक - सोशल मीडियाचा वापर करताना अश्लिल व्हिडिओ, फोटो चुकूनही शेअर झाले, तर हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. यात संबंधित व्यक्तीला जेलवारी ही होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सायबर पोलीस अशा व्हिडिओ, फोटो शेअर करणाऱ्यांवर नजर ठेऊन आहेत.
सायबर पोलिसांची आहे नजर . . . - सध्या मोबाईल मुळे जग जवळ आले आहे. अशात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अशात आता नकळतपणे काही चूकही गंभीर गुन्हा ठरणार आहे. अश्लिल फोटो व्हिडिओ जर तुम्ही कोणाला पाठवत असाल, तर त्यात तुम्हाला कायद्याने तुरुंगवास होऊ शकतो. अश्लिल व्हिडिओ, फोटोची देवाणघेवाण सोशल मीडियाच्या कुठलाही साईटद्वारे जर करण्याचा प्रयत्न केला, तर हा गंभीर गुन्हा होतो. याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले आहे.
मुले स्मार्ट फोनवर काय बघतात . . -कोरोनामुळे अनेक मुलांना शाळेने ऑनलाईन शिक्षण दिले. त्यामुळे पालकांनीही मुलांच्या हाती मोबाईल दिले. मात्र लहान वयात मुलांच्या हाती आलेल्या स्मार्ट फोनमुळे त्याच्या मनावर काय परिणाम होतील, याचा विचार अनेक पालक करत नाहीत. अशात मुलांकडून स्मार्ट फोनवर कुतूहलापोटी नेमके काय बघितले जाते, याचा विचार पालकांनी करायला हवा, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी गंभीर गुन्हा -अश्लिल मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात प्रसिद्ध केल्याप्रकरणी पहिल्यांदा अपराध केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास पाच वर्षाचा कारावास आणि दहा लाख रुपयांचा दंड देखील होऊ शकत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.