नाशिक - महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गमे यांच्या जागी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिवसभरापासून गमे यांच्या बदलीची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू होती. ही केवळ चर्चा असल्याने या बातमीला दुजोरा मिळत नव्हता. मात्र, दुपारी उशिरा राधाकृष्ण गमे यांच्या जागी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले कैलास जाधव सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी ठाणे मुंबई-पुणे-नाशिक यासह विविध जिल्ह्यात यापूर्वी काम केले आहे. नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. महसूल अधिकारी व प्रशासन अधिकारी यांची संघटना बांधण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.