नाशिक- नाशिकमध्ये कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत शहरात नाकाबंदी करण्यात येऊन, विना कारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत 19 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट
नाशिकमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज 5 ते 6 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी काही नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी सक्तीची मोहीम हाती घेतली असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी केली जात आहे.
पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 व 2मधील 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 434 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्या 375 नागरिकांकडून 1 लाख 65 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकरा नागरिकांना आणि दुकानदारांना अकरा हजार रुपये दंड आकारण्यात आला. दुकानाची वेळ आणि मर्यादा न पाळणाऱ्या 13 दुकानदारांकडून 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
या ठिकाणी करण्यात आली नाकेबंदी -
काट्या मारुती, मोडक सिग्नल, चांडक सर्कल, मालेगाव स्टॅन्ड, अशोक नगर, सिडको हॉस्पिटल, अशोक स्तंभ, शिवाजी चौक, नारायण बापू चौक, सातपूर, अंबड, नाशिकरोड, मायको सर्कल आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.