नाशिक - शहरात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात गृह विलगीकरणात जात आहे. अशातच त्यांच्याकडून घरात पाण्याचा वापर होताना कोरोनाचे विषाणू हे सांडपाण्याच्या माध्यमातून बाहेर जातात. यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का, असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र सांडपाण्यातून अथवा हवेतून कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचे स्पष्ट मत नाशिकचे तज्ज्ञ डॉक्टर संजय धुर्जड यांनी मांडले आहे.
'सांडपाण्यातून कोरोनाचा प्रसार होत नाही'
शहरात रुग्ण वाढत असताना कोरोनाचा जास्त त्रास असणाऱ्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहेत. तर सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्ण पाण्याचा वापर करतात, ते सांडपाणी पाईपलाईनद्वारे शहरातील मलनिस्सारण केंद्रात जात असते. त्यानंतर या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी गोदावरी नदीत सोडले जाते. त्यामुळे त्यातून धोका उद्भवू शकतो का, असा प्रश्न समोर येत होता. मात्र कोरोनाचे विषाणू सांडपाण्यात साबणाच्या पाण्यामुळे जास्त काळ जिवंत राहू शकत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अंगावर जर कोरोनाचे विषाणू असले आणि आपण आंघोळ करताना साबण आणि शॅम्पूचा वापर केला, तर हे विषाणू 20 सेकंदापेक्षा जास्त काळ जिवंत राहत नाहीत. त्यामुळे सांडपाण्यातून त्याचा प्रसार होऊ शकत नाही. कोरोनाचे विषाणू फक्त तोंड, नाक आणि डोळे यातूनच शरीरात जात असतात. तसेच हे विषाणू फक्त एक मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात. त्यांचा हवेतून किंवा सांडपाण्यातून प्रसार होत नसल्याचे डॉक्टर धुर्जड यांनी सांगितले आहे.
नाशिक शहरात आहेत 10 मलनिस्सरण केंद्र -
शहरातील तपोवन 3, टाकळी 2, पंचक 3, चेहडी 2, गंगापूर 1 असे एकूण 10 मलनिसरण केंद्र आहे. यापैकी तपोवन भागातील मलनिस्सरण केंद्रातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येते. मात्र, हे पाणी फेसयुक्त असल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण वाढत आहे. याबाबत नाशिकच्या गोदाप्रेमींनी अनेक वेळा आवाज उठवूनही महानगरपालिकेने यावर कुठलेच नियोजन केले नाही. जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी सुद्धा याठिकाणी भेट देऊन नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेने मलनिस्सारण केंद्रातून फेसाळले पाणी बंद करावे, असे सांगितले होते.