नाशिक -राज्यातील रक्तसाठ्यात झालेली तूट भरून काढण्यासाठी आता युवक काँग्रेसनं रक्तदान मोहीम सुरू केली आहे. नाशिकमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी रक्तदान करून या मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये 101 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. महिन्याभरात 25 हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प केल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने, राज्यामध्ये आता रक्ताचा तुटवडा निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात येते आहे. दरम्यान राज्यातील रक्तसाठ्यामध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरात रक्तदान मोहीम सुरू करण्यात येत असून, शुक्रवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिकमध्ये रक्तदान करून या मोहिमेचा शुभारंभ केला आहे. तर महिनाभरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रक्तदान करून 25 हजार बाटल्या रक्त संकलित करतील अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.