नाशिक -भाजपाचा शब्द देऊन तो न पाळण्याचा गुणधर्म आता जनतेच्या आणि योगायोगाने त्यांच्या मित्रपक्षांच्या देखील लक्षात आला असुन त्यामुळेच बहुमत असताना भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही, असे स्पष्ट मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते भालचंद्र कांगो यांनी मनमाड येथे व्यक्त केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कम्युनिस्ट नेते कॉ. माधवराव गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सत्ता स्थापनेसाठी शिवसेना राष्ट्रवादीला पाठिंबा देईल, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो - महाराष्ट्र सत्ता संघर्ष
भाजपचा शब्द देऊन तो न पाळण्याचा गुणधर्म आता जनतेच्या आणि योगायोगाने त्यांच्या मित्रपंक्षाच्या देखील लक्षात आला आहे. त्यामुळे शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाईल, असे मत भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी त्यांनी भाजपाच्या केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारवर सडकून टीका केली भाजपा हा शब्द देऊन तो न पाळणारा पक्ष आहे. हे भाजपच्या मित्रपक्षाच्या माध्यमातून जनतेला कळाले आहे. आता राज्यात येणारे सरकार हे गैरभाजपा सरकार असेल नुसतं गैरभाजपा नसून ते भाजपाच्या धोरणाना तिलांजली देणार सरकार आले पाहिजे. शेतकरी कष्टकरी आणि कामगारांच्या धोरणांना प्राधान्य देणार तसेच समाजात जातीय सलोखा ठेवणार सरकार आले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात सत्तेचा पोरखेळ सुरू आहे. तो कुठे तरी थांबायला हवा तसेच राज्यपाल हे घटनेला धरून निर्णय घेतात की कुणाच्या सांगण्यावरून हे कळायला मार्ग नाही अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात गैर भाजपाचच सरकार बसेल असा टोलाही त्यांनी लगावला. एकंदर परिस्थिती बघता राज्यात लवकरात लवकर सरकार बनले पाहिजे अन्यथा जनतेला माहिती होऊन जाईल की सरकार नसले तरी राज्य चालू शकते, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.