नाशिक -महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या मुख्य इमारतीला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने ह्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक महानगरपालिकेच्या सर्व इमारतीचे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
जीवितहानी नाही, मात्र...
नाशिक महानगरपालिच्या राजीव गांधी भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील विरोधीपक्ष नेते आणि शिवसेना गटनेते यांच्या कार्यालयाला आग लागल्याची आज दुपारी घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी येऊन त्यांनी पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर पूर्णतः जाळून खाक झाले आहे. हे कार्यालय सॅनिटाइझ केल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आग कशामुळे लागली याच्या चौकशीचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे.