नाशिक- शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्व समजावे यासाठी नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्वतःच हातात झाडू घेऊन शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली. आयुक्त जाधव यांच्या या हटके उपक्रमाचे नाशिककरांकडून कौतुक केले जात आहे.
स्वच्छता मोहिमेमध्ये 36 टन कचरा गोळा
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात देशातील पहिल्या पाच स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश होण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी कंबर कसली आहे. सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात दाखल होण्यापूर्वीच स्वच्छतेसाठी स्वतःच हाती झाडू घेत ते मैदानात उतरले आहेत. पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये 36 टन कचरा गोळा करण्यात आला आहे.
आयुक्तांनी हाती घेतला झाडू; ३६ टन कचरा संकलित आठवड्यातून एक दिवस ब्लॅक स्पॉटवर आयुक्त राबविणार मोहीम
नाशिककरांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा या यामागचा उद्देश असल्याचे जाधव म्हणाले, यासाठी आयुक्त जाधव यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहरातले ब्लॅक स्पॉट स्वच्छ केले आहेत. एरव्ही एखाद्या नेत्यांची बड्या अधिकाऱ्याची स्वछता मोहीम म्हंटल की या मोहिमेत स्वछता कमी आणि फोटोसेशन अधिक असते. मात्र,नाशिकच्या आयुक्तांनी ही मोहीम राबवितांना कोणत्याही माध्यमांना निमंत्रित न देता ही मोहीम राबवली आहे. मात्र, त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाला नाशिकरांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्याने आयुक्तांच्या या मोहिमेच सोशल मीडियातून नाशकात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आयुक्त कैलास जाधव ही मोहीम केवळ एकाच दिवसासाठी राबविणार नसून आठवड्यातून एक दिवस ते स्वत: हातात झाडू घेऊन शहराच्या ब्लॅक स्पॉटवर जाऊन काम करणार आहेत.
पालिका आयुक्तांच्या अभिनव उपक्रमामुळे नाशिककरांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण होईल तेव्हा होईल. मात्र आयुक्तांच्या या अनोख्या कामाच्या पद्धतीमुळे पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्येही चांगला संदेश या निमित्तानं गेला आहे. त्यामुळे आता नाशिककरांनी आयुक्तांच्या उद्देशातून या उपक्रमाच अनुकरण केल्यास शहर स्वच्छ व्हायला फारसा वेळ लागणार नाही.