नाशिकच्या सिटीलिंक बस सेवेला वर्षभरात 32 कोटींचा तोटा - nashik citylink bus service news
गेल्या वर्षी 8 जुलै 2021 पासून ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर खाजगी ऑपरेटरच्या माध्यमातून सिटी लिंक ही बस सेवा सुरू झाली, पहिल्या टप्प्यात 250 बसेस चालवल्या जाणार होत्या,त्यात 200 बसेस सीएनजी तर 50 बसेस डिझेल आहेत, सध्या 46 मार्गावर शहरात 210 सिटी बसेस धावत आहेत, वर्षभरात 1 कोटी 63 लाख प्रवाशांनी सिटी लिंक चा वापर केला आहे.
नाशिक -एकीकडे राज्यभरातील परिवहन सेवा तोट्यामध्ये असताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेने परिवहन मंडळाची बस सेवा बंद करून शहर बंद सेवा सुरू केली. आता या बससेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभराचा विचार केला असता एकीकडे प्रवासी वाढत असताना दुसरी मात्र वर्षाला 32 कोटी रुपयांचा तोटा झाल्याच्या समोर आलं आहे. सर्वसाधारण पर्यंत महिन्याला अडीच कोटी रुपयांचा तोटा बस सेवाला होत असल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महानगरपालिका आणखीनच खड्ड्यात जात आहे.
1 कोटी 63 लाख प्रवाशांचा टप्पा - तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेवर भाजपचे सत्ता असल्यामुळे दत्तक नाशिकला भेट म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण करणाच्या नावाखाली परिवहन महामंडळाची बस सेवा नाशिक महानगरपालिका मार्फत चालवण्याचा निर्णय घेतला.मात्र सुरवाती पासूनच ही बस सेवा वादत सापडली असतांना त्यात कोरोनाच्या दोन्ही लाटा असल्यामुळे बस सेवा वेळेमध्ये सुरू होऊ शकली नाही. अत्यंत कमी प्रवासी प्रतिसाद असताना तसेच शाळा व महाविद्यालय बंद असताना 8 जुलै 2021 ला फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात 27 बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, पहिल्या दिवसापासूनच बस सेवेचा तोटा वाढत चालल्यामुळे शहरापेक्षा लगतच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये बस सेवा करून उत्पन्नाचा ताळमेळ जुळण्याचे प्रयत्न सुरू होते. यात आता या बस सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीमध्ये 1 कोटी 63 लाख प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. वर्षभरात बससेवेची संख्या 27 वरून 210 वर पोहोचली असून प्रतिदिन प्रवाशांची संख्या 70 हजार झाली आहे. दररोज सर्वसाधारण 20 लाख रुपये उत्पन्न मिळत असून त्यानुसार वर्षभरात सुमारे एकूण 39 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यात वर्षभरात 71 कोटी खर्च आला असून,उत्पन्न मात्र 39 कोटी असून उत्पन्न सिटीलिंग बस सेवेचा तोटा 32 कोटी वर गेला असून, प्रति किलोमीटर मागे सरासरी 70 रुपये इतके उत्पन्न अपेक्षित असताना, सद्यस्थितीत जेमतेम 45 रुपये प्रति किलोमीटर मागे मिळत आहे.
ग्रामीण भागात ही बससेवा सुरू -नाशिक शहरामध्ये सिटी लिंक बस सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बघत, तोटा कमी करण्यासाठी त्रंबकेश्वर, सायखेडा, ओझर, सिन्नर दिंडोरी तसेच आता कसाऱ्यापर्यंत बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे..
अशी आहे बस सेवा -गेल्या वर्षी 8 जुलै 2021 पासून ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर खाजगी ऑपरेटरच्या माध्यमातून सिटी लिंक ही बस सेवा सुरू झाली, पहिल्या टप्प्यात 250 बसेस चालवल्या जाणार होत्या,त्यात 200 बसेस सीएनजी तर 50 बसेस डिझेल आहेत, सध्या 46 मार्गावर शहरात 210 सिटी बसेस धावत आहेत, वर्षभरात 1 कोटी 63 लाख प्रवाशांनी सिटी लिंक चा वापर केला आहे.
उत्पनाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणार -प्रति किलोमीटर 20 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न देणाऱ्या मार्गाबाबत दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे,सिटी लिंक मनपा संचलित करीत असली तरी या बस सेवेच्या तोट्याचा भार पेलण्या इतपत आर्थिक दृष्ट्या महानगरपालिका सक्षम नाही असं खुद्द नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी म्हटलं आहे.