नाशिक - गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले.
गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.
मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण-
शासनाच्यावतीने ‘मी जबाबदार’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला पुढे घेवून जाण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून आज विशेष उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरिक प्रतिसाद देतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्णवाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांच्याकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.
कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट या त्रिसूत्री वर भर-
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर बेड, रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शासनाने घालून दिलेल्या टेस्ट ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्री चा प्रभावी अंमल सर्व यंत्रणा मिळून करतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्र्याना सादरीकरणाद्वारे सांगितले. तसेच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी मधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी मांडली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा नाशिक प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजना जसे वैद्यकिय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहिम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
हेही वाचा-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी