नाशिक - आर्म स्ट्रॉंग कंपनीत छगन भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ हे मुंबईतील नऊ मजली घरात राहतात. तो कुणाचा आहे ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. भुजबळांचे घर कुणाचे आहे, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी शोधून दाखवा असे आवाहनही सोमैय्या यांनी दिले.
भाजप नेते किरीट सोमैय्या हे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमैय्या म्हणाले की, भुजबळ यांनी आपल्या संपत्तीचे मालक कोण आहेत, हे स्पष्ट करून माहिती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना चुकीचे काम केल्याबद्दल मंत्रिमंडळातून बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा-Marital Rape : पत्नीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार नाही का? कायदा काय सांगतो...
भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचे सौमय्या यांनी केले गंभीर आरोप
सोमैय्या यांनी बुधवारी वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बांधलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरासाठी भुजबळ यांनी पैसा कुठून आणला. मुंबईतदेखील भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे सोमैय्या म्हणाले, की मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहीर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमधील पैसा कुठून आला? आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भुजबळ यांच्याशी निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल, नाशिक, अंधेरी व सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
यापुढे लिस्टमधील 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड असल्याचे सूचक वक्तव्य सोमैय्या यांनी केले आहे.