उज्जैन -मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिर प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दररोज येथे हजारो भाविक दर्शनास येतात. कोरोना काळात मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ऑलनाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, नाशिकच्या पाच भाविकांची दर्शन घेण्यासाठी गेले असता फसवणूक झाली.
उज्जैनमधील महाकाल मंदिरात नाशिकच्या भाविकांची फसवणूक मंदिराच्या सुरक्षा रक्षकाने फसवले -
नाशिक येथून प्रकाश गायकवाड आणि इतर चार जण उज्जैनाला महाकालच्या दर्शनला आले होते. महाकालचे दर्शन निशुल्क आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. या सर्वांनी ऑनलाइन नोंदणी केली नव्हती. नोंदणी केल्यानंतर मोबाईलवरील संदेशाच्या आधारे आतमध्ये प्रवेश देण्यात येतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर नोंदणी गरजेची असल्याचे त्यांना समजले. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर काम करणाऱ्या महेश परमार नावाच्या सुरक्षा रक्षकाने त्यांची कॉम्युटरवरून नोंदणी करून दिली. मात्र, बुकिंगसाठी पैसे घेतले.
भाविकांच्या फसवणूकीच्या घटना सर्रास घडतात -
मंदिरात प्रवेश करताच निशुल्क प्रवेश असून आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने सुरक्षा रक्षक महेश याची हकालपट्टी केली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. देशभरातून भाविक येथे येतात. मात्र, लुटारु आणि भुरट्या चोरांचा त्यांना सामना करावा लागतो. अनोळखी ठिकाण असल्याने भाविकांना चांगलाच मनस्ताप होते.