महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..तर समीरची उमेदवारी मागे घेईन; भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान - Devendra Fadnvis

निवडणूक काळात मुख्यमंत्री दबाव टाकत आहे. या दादागिरीला आणि दबावाला बळी पडणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ

By

Published : Apr 27, 2019, 8:14 PM IST

नाशिक - मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत माझ्यावर आणि राज ठाकरे यांच्यावर असत्य टीका केल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सदनचा ठेकेदार चमनकरला सरकारी तिजोरीतून एक पैसा दिला हे सिद्ध करा, असे आव्हान भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसे केल्यास समीर भुजबळ यांची लोकसभेची उमेदवारी मागे घेईन, असेही ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कुंभमेळ्याचे नियोजन आणि विकासकामे आपण पालकमंत्री म्हणून केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र, हीच कामे गिरीश महाजन यांनी केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, अशी टीकाही त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, कुंभमेळ्याला फडणवीस सरकारने एक पैसा दिला नाही. आघाडी सरकारने पैसा दिला आहे. तसेच केंद्राने पालिकेला एक रुपयाही दिला नाही. मांजरपाड्याचे धरण पाठपुरावा करून केले असताना मुख्यमंत्री श्रेय घेत असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.


तुरुंगात टाकण्याची भीती दाखवतात - छगन भुजबळ
भ्रष्टाचाराच्या नावाखाली आमच्यावर अनेक खोटे आरोप केले, असा त्यांनी दावा केला. समीर भुजबळ यांच्यावरील खारघरची केस खोटी आहे, हा न्यायालयाचा निष्कर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावरील आरोप अयोग्य असल्याचे पत्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.

छगन भुजबळ

निवडणूक काळात मुख्यमंत्री दबाव टाकत आहे. या दादागिरी आणि दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. न्यायव्यवस्था हाताशी धरून दबाव आणण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे का? असा सवाल भुजबळांनी केला. आम्ही निर्दोष सुटणार असून खोटे गुन्हे दाखल केल्याचे सिद्ध करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून आरडाओरड करून भाषण करत, असल्याचा टोलाही भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अभ्यास करून आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच न्यायालयातही तक्रार करणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details