नाशिक- वडिलांसोबत फिरायला गेलेली अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि.12) रात्री बेपत्ता झाल्यानंतर तिचा उपनगर पाेलीस व बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ‘गुगल’ या श्वानाच्या मदतीने शोध घेण्यात आला. गुगलने ( Google ) सुमारे एक तास शोध घेतल्यानंतर बालिकेला आई वडिलांच्या स्वाधिन केले. दरम्यान, या मुलीवर शारीरीक अत्याचार झाल्याचे पुढे आले असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पाेक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधारात मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली -उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी रात्री 9 वाजण्याच्या समारास तिच्या वडिलांसोबत फिरायला गेली होती. काम असल्याने वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने वडील घरी गेले. मात्र, त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही. मुलीचा शोध सुरू झाला. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना समजली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. मुलीचा शोध तिच्या घराजवळील परिसरातच सुरू होता. नातलग आणि पोलिसांनी परिसरातील बहुतांशी घर, टेरेस, मैदान, इमारतींच्या गच्ची सर्व ठिकाणी मुलीचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गुगल या श्वानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. गुगलला बेपत्ता मुलीच्या कपडे व चपलांचा वास दिला. त्यानंतर गुगलेने त्याची जबाबदारी चोखपणे बजावली. वडिलांनी मुलीला जेथे सोडले तेथून गुगलने मुलीचा मार्ग काढला. परिसरातीलच अंधारातून मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांना आणि पालकांना पाहून मुलीच्या चेहऱ्यावरील भीती दूर झाली. उपनगरचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक निलेश माईनकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, श्वान पथकाचे गणेश लोंढे, सुजित देसाई, गांगुर्डे, अरुण चौहाण यांनी कामगिरी बजावली.