नाशिक - लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या काळात नागरिकांना वीजवितरण कंपन्यांकडून आलेले अवाजवी वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक शहराच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांना अधिकची आलेली बिल रद्द करावी, असे आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून नागपुरात काँग्रेस पक्ष भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरी भाजपने वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा -हे सरकार साधु-संत आणि महंतांच्या विरोधात आहे का? आमदार विनायक मेटेंचा सवाल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात सर्वच उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना राज्य शासनाने सरासरी वीज बिल देण्यात यावे, अशा सूचना महावितरण विभागाला केली होती. मात्र, तीन महिन्यानंतर आलेले बीज बिल बघून सर्वसामान्यांना झटकाच बसला आहे. सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना महावितरणने अंदाजे भरमसाठ विज बिल दिल्याचे सांगत अधिकचे वीजबिल त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी नाशिक भाजपच्या वतीने करण्यात आली. यासाठी नाशिक शहरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.