नाशिक - त्रिपुरात मशीद पाडल्याच्या कथित वृत्तानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटणे यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल, असा जाब विचारत आज स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
'हिंदुत्व सोडले का?'
सरकार वाचवण्यासाठी तसेच निवडणुकीमध्ये एका समाजाची मते मिळाली, यासाठी काळजी घेतली जात आहे. परंतु हे चुकीचे आहे. आपले हिंदुत्व सोडले का, असा प्रश्न उपस्थित करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की उठतासुठता भाजपावर आरोप करणे हे चुकीचे आहे. नागरिकांना समजते, की कोण काय करतो, असा टोलादेखील शिवसेनेला लगावला आहे.
'तुम्हाला कोणी अडवले?'
राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) ला झोपताना, उठताना बीजेपी दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) आम्ही सुरू केला, आरोग्य विभागाचा पेपर आम्हीच फोडला, शेतकरी पैसे आम्ही थांबवले, काय चालवली आहे चेष्टा, असे ते म्हणाले. सगळीकडे भाजपाचा हात आहे, असे म्हणता, मग तुम्ही तीन पक्ष समर्थ आहात ना? भाजपाचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवले, असे आव्हान त्यांनी दिले.