नाशिक - कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर आपल्याला परत एकदा अतिशय कडक निर्बंध टाकावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. कडक निर्बंध टाकले गेले तर किती त्रास होतो, याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळे नाशिककरांनो सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
कारवाई केल्याशिवाय लोकांना कळणार नाही-
छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, कोरोना रोग हा भयानक आहे. आपल्याला तीव्रता समजली पण गांभिर्य कमी झाले. विनामास्क ग्राहकांसोबत व्यवहार करणाऱ्या दुकानदाराचे दुकानच बंद करण्याची कडक कारवाई केली जाईल. कारवाई केल्याशिवाय लोकांना कळणार नाही. तसेच कोरोना झाल्यानंतरही काही रुग्णांना त्रास होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी आता जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर उभारणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
कांद्या प्रश्नाबाबत उद्या शरद पवारांची भेट घेणार-
कांद्या प्रश्नाबाबत उद्या शरद पवारांची भेट घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय मंत्र्यांकडे तोडगा काढण्याबाबत विनंती केली जाईल. असे भुजबळ यानी सांगितले.
शेतकरी आंदोलनाबाबत लवकर निर्णय घ्यावा-
शेतकरी आंदोलनाबाबत भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत लवकर निर्णय घ्यावा. ते परत गेले तर त्यांच्या मनात जखम कायम राहील. त्यांना शांत करण्यासाठी साकारात्क निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केले.