नाशिक -नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातून चंदन चोरी करणाऱ्या सराईत चोराला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनला येथे सापळा रचून जावेदखा पठाणला ( Javedkha Pathan arrested for stealing sandalwood ) अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शहरातील पाच चंदन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
हेही वाचा -Yeola Crime : येवल्यात दोन गटामध्ये लाकडी दांडक्याने मारत तुंबळ हाणामारी
16 फेब्रुवारीला मध्यरात्री विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्याच्या आवारातून मध्यरात्री चंदन चोरी झाल्याची घटना घडली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्याच्या आवारातून चोरी करून चोराने थेट पोलिसांना आवाहन दिले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची नोंद भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही आणि गोपनीय माहिती मिळाल्याने पथक जालना येथील भोकरदनला रवाना झाले. तंत्र विश्लेषण प्रणालीचा वापर करत संशयितावर नजर ठेवण्यात आली. पथकाची चाहूल लागल्यानंतर संशयित्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्याच अंतरावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जय ढमाळ, व्ही.बी. उगले, रवींद्र बागुल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.