नाशिक -नाशिक शहरात मागील 15 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्याने नाशिक पोलीस रस्त्यावर उतरली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून आता पर्यंत 94 जणांवर कारवाई करत त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह-
नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून 15 दिवसात 13 हजारहुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यात सर्वधिक रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. मात्र असं असतांना देखील नागरिकांना याचे गांभीर्य नसून अनेक जण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतांना दिसत आहे. या विरोधात आता नाशिक पोलीस रस्त्यावर उतरले असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे हे स्वतः या मोहिमेत रस्त्यावर उतरले असून नाशिकच्या वेगवेगळ्या भागात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. आतापर्यंत 94 नागरिकांना कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात येऊन त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकीच 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.