नाशिक -बुधवारी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन गळती झाल्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली आहे.
घडलेल्या घटनेसंदर्भात पुढील प्रश्न उपस्थित होत आहे
- तीन आठवड्यांपूर्वी सुरू केलेल्या या ऑक्सिजन टाकीला गळती लागली कशी?
- ऑक्सिजन टाकी सुरू करण्यापूर्वी यंत्रणेने गुणवत्ता चाचणी केली होती की?
- ऑक्सिजन टाकी मध्ये बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवली गेली नाही का?
- ऑक्सिजन टाकीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आला नव्हता का?
- ऑक्सिजन टाकी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे का बसवण्यात आले नाही?
- ऑक्सिजन टाकी रिफिल करतांना गळती झाली असेल तर रोखण्यासाठी तंत्रज्ञ का नव्हते ?
- ऑक्सिजन टाकी दुरुस्तीसाठी दहा वर्षाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा नाही का?