नाशिक -कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात आज ( शुक्रवारी ) भव्य ग्रंथ दिंडीने ( Marathi Sahitya Sammelan begins in Nashik ) करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात -
यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली आहे.