नाशिक -अनेक वेळा सूचना देऊनही हॉटेल चालकांनी फायर ऑडिट न केल्याने 455 हॉटेलचालकांना आता महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. हॉटेल्सचालकांना नोटीस बजावण्यात येणार असून निर्धारित मुदतीत फायर ऑडिट न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
सर्वेक्षणातील माहिती
मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नाशिक महापालिकेने देखील शहरातील सर्व हॉटेल्सचालकांना फायर ऑडिट बंधनकारक केले होते. मात्र महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील 538 हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारपैकी अवघ्या 83 हॉटेल्स व रेस्टॉरंट धारकांनीच फायर ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तब्बल 455 हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांनी अद्यापही फायर ऑडिट केले नसल्याने या हॉटेल्स चालकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
'दंडात्मक कारवाई होणार'
साडेतीन वर्षांपूर्वी मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलला आग लागून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली होती. या घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टारंटचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 व नियम 2009 हे 6 डिसेंबर 2008पासून लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टारन्ट, बियरबार, रुग्णालये, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, ऑफिसेस अशा व्यावसायिक इमारती, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक इमारती, गोदामे सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती तसेच पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवाशी वापराच्या इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
'निर्धारित मुदतीत फायर ऑडिट करावे लागणार'
इमारतीत आग लागल्याची घटना घडल्यास वेळीच ही यंत्रणा कार्यान्वित करून आगीपासून संरक्षण प्राप्त होते. यंत्रणा बंधनकारक करताना त्या सुस्थितीत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑडिटचे बी-प्रमाणपत्र मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार फायर ऑडिट करण्याचे निर्देश महापालिकांनी संबंधित व्यावसायिक इमारतधारक, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टांरट व बियरबार चालकांना दिले होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील 538 हॉटेल्स, रेस्टांरट, बियरबार व लॉजेसपैकी आतापर्यंत केवळ 83 हॉटेल्स, रेस्टांरट यांनीच फायर ऑडिट केल्याचे समोर आले आहे. सुमारे 455 हॉटेल्स व रेस्टारंट, बार यांनी फायर ऑडिट केलेले नाही. कोरोनामुळे या हॉटेल्सचालकांवरील कारवाई थांबली होती. आता कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने या हॉटेल्सचालकांना नोटीस बजावण्यात येणार असून निर्धारित मुदतीत फायर ऑडिट न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
'50 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावणार'
फायर ऑडिट न करणाऱ्या 455 हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शहरातील काही पंचतारांकित हॉटेलचेही फायर ऑडिट झाले नाही. नोटीसच्या निर्धारित मुदतीत संबंधितांनी फायर ऑडिट न केल्यास नियमाप्रमाणे इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करणे व इमारती सील करण्यासह 50 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.