नाशिक - ठेकेदाराने झाडावर कुऱ्हाड चालवल्यामुळे तब्बल 18 बगळ्यांचा बळी गेला. ही संतापदायक घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दोन इमारतीमधील वादात या पक्ष्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने ठेकेदाराचे साहित्य जप्त करुन कारवाई सुरू केली आहे.
तीन बगळ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू
नाशिकमध्ये वेळोवेळी वृक्षतोड करण्यात येत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वृक्ष आणि पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने याचा विरोध केला जातो. तरीही याची दखल घेतली जात नसल्याने 18 बगळ्यांना जीव गमवावा लागला आहे. गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका बहरलेल्या झाडावर वंचक आणि गाय प्रजातीच्या बगळ्यांनी आसरा घेतला होता. मात्र यामुळे परिसरातील सुशील अपार्टमेंट आणि सिद्धी पूजा ग्लोरा अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना पक्षांच्या विष्टेचा आणि झाडाच्या पानांचा त्रास होता. याबाबत त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले. या सोसायटी समोरील डेरेदार वृक्षावर महापालिकेच्या एका ठेकेदाराकडून दोरखंड लावून चेन सॉ मशीन चालवण्यात आली. यामुळे बगळ्यांनी झाडावर उभारलेली घरटी जमिनीवर पडल्याने पक्षाची अनेक अंडी आणि जवळपास 15 बगळ्याचा मृत्यू झाला. तीन बगळ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.