नागपूर - पाकिस्तान मध्ये नागपूरच्या नावाची कमालीची दहशत निर्माण झाल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. दहशतवादाच्या मुद्यावरून जागतिक पातळीवर पितळ उघडे पडलेल्या इमरान खान यांना जेव्हा काही सुचत नाही, तेव्हा ते नागपूरच्या नावाचा जप करत असल्याचे देखील योगी म्हणाले. ते आज पश्चिम नागपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
नागपूरच्या नावाची पाकिस्तानमध्ये दहशत - योगी आदित्यनाथ - नागपूर भाजप लेटेस्ट न्यूज
पाकिस्तानमध्ये नागपूरच्या नावाची कमालीची दहशत असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते नागपूर विधानसभा मतदारसंघात सभेला संबोधित करत होते.
प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रमल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी एकाची दिवशी नागपुरात दोन प्रचार सभांना संबोधित केलं. पश्चिम नागपुरात आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी कलम 370 काढल्याच्या मुद्यावरून भाषणाला सुरुवात केली, त्यानंतर तिहेरी तलाक, एनआरसीच्या मुद्यावरून केंद्र सरकारच्या कामांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर कडाडून हल्ला चढवला. ज्या वेगाने नागपूरचा विकास होतो आहे, त्यांमुळे व्यापक परिवर्तन बघायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. युपीए सरकारच्या काळात विकास तर होऊ शकला नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वैयक्तिक विकास तीव्र गतीने झाल्याचा आरोप करत त्यांनी परिवार वादावर टीका केली. यावेळी त्यांनी राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा दावा देखील केला.