नागपूर -पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या रुग्णालयात महिलेला योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड कोली. यानंतर एकाने गाडीतील पेट्रोल आणून चक्क रिसेप्शन काऊंटर पेटवले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, कर्मचाऱ्यांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कुटुंबीयांकडून रुग्णालयाची तोडफोड
एका कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला तीच्या पतीने टेका नाका परिसरातील होप रुग्णालयात दाखल केले होते. महिलेच्या कुटुंबीयांकडून उपचारासाठी रुग्णालयात पैसे भरण्यात आले, मात्र तरी देखील आणखी पैसे मागत असल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुबींयाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. दरम्यान दुपारी डॉक्टर मुरली यांना महिलेच्या मृत्यूचे कारण विचारण्यासाठी नातेवाई गेले असता, तिथे वाद झाला. नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. तसेच रुग्णालयाची तोडफोड देखील करण्यात आली. याच दरम्यान एकाने गाडीतील पेट्रोल आणून रिसेप्शन काऊंटर पेटवले, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.