नागपूर -अल्पवयीन मुलीच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून हत्या केल्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचे बिंग फुटले आहे. नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पारडी पोलिसांनी निशा गाजभिये, या महिलेला अटक केली आहे, तर तिच्या अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.
11 एप्रिलला या घटनेतील मृत धर्मेंद्र नरेश गजभिये ( वय 40 वर्षे ) चे त्याची पत्नी निशासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी संतापलेल्या निशाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात ( Nagpur Police ) दाखल केली होती. मात्र, हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्रने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंंतर पारडी पोलिसांनी निशाला अटक केली आहे. तर तिच्या अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.