नागपूर -शिरूर आणि औरंगाबाद येथे घडलेल्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत. पोलिसांमार्फत या घटनांचा तपास सुरू झालेला आहे. तपास जलदगतीने पूर्ण व्हावा आणि तत्काळ आरोपींना अटक व्हावी, याकरिता पोलीस विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. आरोपी नक्की पकडल्या जातील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते दोन दिवसीय दौऱ्यावर नागपूरला आले असताना बोलत होते. शिरूर येथील घटनेपूर्वी आरोपींनी रेकी केल्याची माहिती समोर आली असून त्याच परिसरातील गुन्हेगार यामध्ये सहभागी असावेत, असा संशय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
'समीर वानखेडेंच्या चौकशीचा प्रश्नच नाही' -
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे विरोधात गंभीर आरोप केले आहेत. एवढचं नाही तर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की या संदर्भात मला काहीही माहिती नाही आणि त्यांनी अद्याप कोणतेही पुरावेदेखील दिलेले नसल्याचे गृहमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. समीर वानखेडे हे केंद्रीय एजन्सीचे अधिकारी असल्याने राज्य सरकार त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले आहेत.