नागपूर - उन्हाळा आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना इतक्यात दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या मान्सूनचे आगमन लांबल्याने पुढील दोन दिवस ते तीन दिवस विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये 'हिट वे' (उष्णतेची लाट) चा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर दाखल झाला आहे. तरी विदर्भात 10 जून ते 16 जूनच्या मध्येच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी वर्तवली आहे. या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली ( Warning of heat wave in Vidarbha ) आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत दिवसाचे तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जात आहे. तर, रात्री देखील उष्ण वारे वाहत असल्याने तापमानाचा पारा सामन्य पेक्षा 5 सेल्सिअसने वाढला आहे. त्यामुळे कुलर आणि वातानुकूलित (एसी) सुद्धा काम करत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागलेले आहेत. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात पावसाचे आगमन होते. मात्र, यावर्षी भारतात मान्सून वेळेवर दाखल झाला, तरी विदर्भात निर्धारित वेळेवर (10 ते 15) जून दरम्यान पावसाचे आगमन होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षात कधी झाले पावसाचे आगमन -विदर्भात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. गेल्या दहा वर्षात विदर्भात कोणत्या तारखेला मानसूनचे आगमन झाले, यावर एक नजर टाकूया. २०१२ साली 18 जून रोजी विदर्भात पावसाचे आगमन झाले आहे. तर २०१३ साली १० जून रोजी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. २०१४ साली १९ जून, २०१५ साली १४ जून, २०१६ साली १९ जून, २०१७ साली २२ जून, २०१८ साली ८ जून, २०१९ साली २३ जून, २०२० साली १३ जून, २०२१ साली ९ जून रोजी विदर्भात मान्सून सक्रिय झाला होता.