नागपूर- विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आता विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून या माध्यमातून विदर्भातील जिल्हे सुखी-समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी म्हटले आहे. ते महामंडळाच्या बैठकीनंतर बोलत होते.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यास सुरुवात विदर्भात एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण विदर्भात सिंचनसह विकासाच्या बाबतीत मोठा अनुशेष निर्माण झाला आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे दर वर्षाला हा अनुशेष वाढतच आल्याने तो भरून काढणे आता जवळ-जवळ कठीण होऊन बसले आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने महामंडळे वाटताना विदर्भ विकास महामंडळावर भाजप नेते चैनसुख संचेती यांची नियुक्ती केली. त्यामुळे आता विदर्भाच्या विकासासंदर्भात बैठकांना सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यात उद्योग, शाश्वत सिंचनाचा सोयी कशा निर्माण करता येईल याचा प्रामुख्याने विचार केला जात असल्याचे चैनसुख संचेती यांनी सांगितले.
यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार झाले असून हा अहवाल राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. तर गोंदिया, वाशिम जिल्ह्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात विदर्भाचा सिंचनाचा भौगोलिक अनुशेष विशेषतः अमरावती विभागात तब्बल 1 लाख 79 हजार 477 हेक्टर असल्याचे सांगून या भागात सिंचनावर शासन मोठ्या प्रमाणावर काम करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.