नागपूर - नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी लॉकडाऊन दरम्यान गरजूंना मदत देण्यासाठी भरवलेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
मदत पोहोचवताना राजकीय मंडळींकडून 'सोशल डिस्टन्स'चा फज्जा; कार्यकर्ते फोटो काढण्यात व्यग्र
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी लॉकडाऊन दरम्यान गरजूंना मदत देण्यासाठी भरवलेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गरजू व्यक्तींना अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले. हिंगणा, कळमेश्वर, सावनेर, मौदा, कामठी अशा अनेक तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते हे किट्स वाटण्यात आले. त्यांच्यासोबत पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कामठीच्या कार्यक्रमात स्थानिक आमदारांची देखील उपस्थिती होती.
मात्र, अनेक ठिकाणी रेशन किट्स वाटपाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची गर्दी सोशल डिस्टन्सिंग विसरून फोटोच्या फ्रेममध्ये येण्यासाठी गर्दी केली. तर, काही ठिकाणी रेशनसाठी नागरिक गर्दी करताना दिसले. सोशल डिस्टन्सचे पालक करून कोरोनाचा लढा बळकट करण्याऐवजी राजकीय मंडळी सार्वजनिक कार्यक्रमांमधून त्याचा फज्जा उडवत आहेत. मदतीच्या नावाखाली परिस्थिती अशीच राहिल्यास येणाऱ्या काळात ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास वेळ लागणार नाही.