महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे वांझोट्या म्हशीला लेकराची आस - विजय वडेट्टीवार

केंद्राच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे वांझोट्या म्हशीला लेकराची आस असल्याचं ते म्हणाले.

vijay-wadettiwar-on-on-union-budget
vijay-wadettiwar-on-on-union-budget

By

Published : Feb 1, 2021, 5:00 PM IST

नागपूर -केंद्राच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे वांझोट्या म्हशीला लेकराची आस असल्याचं ते म्हणाले. आपल्या देशात वित्तीय तूट साडे नऊ टक्क्यांपर्यंत गेली आहे. जीडीपी उणे सात टक्के झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते, मात्र केंद्र सरकारच्या खिशात नाही नोट आणि खैरातांची वाटली मोट, अशी अवस्था झाल्याचे टीकास्त्र विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर सोडले आहे.

विजय वडेट्टीवार अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ज्या राज्यात आगामी काळात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यातील जनतेला खुश करण्याकरीता भरघोस घोषणा केल्या असून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी केंद्रांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात तर असं जाणवत आहे की, महाराष्ट्र हा या देशाचा भाग आहे की नाही, अशी वागणूक केंद्राने दिल्याचं वडेट्टीवार म्हणाले. हे सरकार देशातील सारं काही विकायला निघाले आहे. एअर इंडियानंतर आता विमा कंपनीमध्ये ७४ टक्के परदेशी गुंतवणुकीला चालना या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. पुढच्या काळात तर हे सरकार जमिनी सुद्धा विकण्याचा तयारीत असल्याचं दिसत आहे. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती ही पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही वाईट झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.


वडेट्टीवार यांचे केंद्राला टोमणे -

आता तर केवळ प्रभु राम हेच या देशाला वाचवतील की काय, अशी भावना केंद्राच्या मनात असल्याचे चिमटे वडेट्टीवार यांनी काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरात लवकर प्रभू रामाचं मंदिर उभारून जणू रामाला साकडंच घालणार आहेत, की हे प्रभू रामचंद्रा माझ्या देशाला वाचावं, मी काहीही करू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था देशाची त्यांनी केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details